पेसा मोबिलाईझर आंदोलनाला यश; १५ जुलैला मंत्रालयात होणार निर्णायक बैठक

संगमनेर Live
0
पेसा मोबिलाईझर आंदोलनाला यश; १५ जुलैला मंत्रालयात होणार निर्णायक बैठक

◻️ ग्रामविकास आणि आदिवासी मंत्र्यांच्या मध्यस्थीनतंर आझाद मैदानातील आंदोलन स्थगित

संगमनेर LIVE (​मुंबई) | मुंबईतील आझाद मैदान येथे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेसा मोबिलाईझर संघर्ष समितीने पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. बुधवारी राज्य सरकारचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा केल्याने या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

पेसा मोबिलाईझरची पदे कमी न करण्याच्या मुख्य मागणीवर शासनाने अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक भूमिका घेतली आहे. या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, येत्या १५ जुलै रोजी मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ग्रामविकास मंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि दोन्ही विभागांचे प्रधान सचिव उपस्थित राहणार असून, यामध्ये मागण्यांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर, दिवसभर कोसळणाऱ्या पावसातही ठाम असलेल्या पेसा मोबिलाईझर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी कॉ. मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, डॉ. अमोल वाघमारे आणि कॉ. आयआरटी इराणी यांनी मार्गदर्शन केले.

या आंदोलनासाठी गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, पुणे आणि अहिल्यानगर अशा एकूण १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांतून हजारो पेसा मोबिलाईझर उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.

दरम्यान, ​आता १५ जुलैच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार या मागण्यांबाबत काय ठोस निर्णय घेते, यावर पुढील दिशा अवलंबून असेल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !