आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काॅग्रेस कटिबध्द - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काॅग्रेस कटिबध्द - बाळासाहेब थोरात

◻️ ​शबरी माता संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काॅग्रेस पक्षात प्रवेश

​संगमनेर LIVE | “आदिवासी आणि नाईकराजे समाज अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू आहे. या समाजाच्या शिक्षणातून प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक मुलाने शिक्षण घेणे गरजेचे आहे. काॅग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा आणि समतेचा विचार मानणारा पक्ष असून, या समाजाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत,” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर ​तालुक्यातील कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमध्ये शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या वतीने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शबरी माता संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी भिल्ल समाजाला ‘नाईक राजे’ ही मानाची उपाधी दिली. हा समाज ऐतिहासिक काळापासून अत्यंत प्रामाणिक राहिला आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना देऊन गरिबाला मताचा अधिकार दिला. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी १९९२ मध्ये आपण आदिवासी आश्रम शाळा सुरू केली, ज्याचा लाभ घेऊन आज अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करत आहेत. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यामुळे आपल्या मुलांना शिका आणि मोठे करा,” असे आवाहन त्यांनी केले.

सध्या भाजप जातीचे राजकारण करून समाजात भेदभाव निर्माण करत आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवन व राम मंदिराच्या उध्दघाटनाला न बोलावणे, हा आदिवासी समाजाचा अपमान आहे, अशी टीका थोरात यांनी केली. तसेच, आदिवासी समाजाला ‘वनवासी’ संबोधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजाची हीन भावना व्यक्त केली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यावेळी शबरी माता संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे यांच्यासह नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्हा येथील शेकडो पदाधिकाऱ्यांनी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर काॅग्रेसच्या विचारांचा प्रचार करणार असल्याचे दीपक बर्डे यांनी सांगितले.

दरम्यान, ​या मेळाव्याला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव आणि काॅग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !