आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभेतील प्रलंबित प्रश्नांची वाचली यादी
◻️ पाणीपुरवठा, रस्ते आणि नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विधानभवनाचे वेधले लक्ष
संगमनेर LIVE (मुंबई) | संगमनेर शहर व तालुक्यातील मूलभूत सोयी-सुविधा, रखडलेली पाणीपुरवठा योजना, कत्तलखान्याचा प्रश्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रलंबित कामांबाबत आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी संगमनेरच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या सभागृहात मांडल्या आहेत.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत संगमनेरसाठी मंजूर झालेली वाढीव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांनंतरही केवळ ४५ टक्के पूर्ण झाली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार खताळ यांनी केली. तसेच, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेसाठी अतिरिक्त ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणीही त्यांनी केली.
नगरपालिकेच्या शाळांची दुरवस्था, भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाअभावी प्रवरा व म्हाळुंगी नदीत सोडले जाणारे दूषित पाणी, या गंभीर मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नगरपालिकेला भरावा लागणारा दंड नागरिकांच्या कराच्या पैशातून का? असा सवाल करत, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
शहराच्या हद्दीत आणि नदीलगत सुरू असलेल्या कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या नियमानुसार हा कत्तलखाना शहरापासून किमान तीन किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक असताना, तो नियमबाह्यपणे सुरू असल्याचा आरोप करत, हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
तालुक्यातील रस्ते विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत, आमदार खताळ यांनी विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची आणि मजबुतीकरणाची मागणी केली. यामध्ये चिंचोली गुरव, नान्नज दुमाला, गुंजाळवाडी-राजापूर आणि रणगाववाडी-वरवंडी यांसह अनेक प्रमुख मार्गांचा समावेश आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर-कोपरगाव रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशीही सूचना त्यांनी केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी संगमनेरमधून मोठ्या संख्येने भाविक प्रवास करणार आहेत. नाथपंथीयांच्या दिंड्यांचा मुक्कामही शहरात होत असल्याने, या कालावधीत नागरी सुविधा पुरवण्यासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या या मागण्यांमुळे संगमनेरच्या विकासाचा मुद्दा राज्यस्तरावर चर्चेत आला असून, आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.