संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने १२ लाखांचे गोमांस केले जप्त
◻️ बुधवारी पहाटे धाड पडताच अंधाराचा फायदा घेत दोघे फरार
संगमनेर LIVE | पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात धाड टाकून तब्बल १२ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह गोमांस आणि एक पिकअप वाहन जप्त केले आहे. गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी नेणाऱ्या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले.
दिनांक १ जुलै २०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहरात गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेहान उर्फ जादु कुरेशी आणि त्याचा साथीदार काशीब कुरेशी हे दोघे सुकेवाडी रोडवरील जिजामाता इंग्लिश स्कूलजवळील मोकळ्या जागेत एका पिकअपमधून कत्तल केलेल्या गोमांसाची वाहतूक करणार आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहुल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता, त्यांना ६ लाख रुपये किमतीचे दोन हजार किलो गोमांस आणि ६ लाख रुपये किमतीची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी मिळून आली. हा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रेहान उर्फ जादु कुरेशी आणि काशीब कुरेशी (दोघे राहणार संगमनेर) यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डीले, महादेव भांड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे विशेष पथकाने केली आहे.