संगमनेरमध्ये हजारो नागरिकांचा विराट ‘मशाल मोर्चा’

संगमनेर Live
0
संगमनेरमध्ये हजारो नागरिकांचा विराट ‘मशाल मोर्चा’
◻️ बाळासाहेब थोराताच्या नेतृत्वात लाठीहल्ल्याचा निषेधार्थ समविचारी पक्ष उतरले रस्त्यावर

​संगमनेर LIVE | दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने केलेल्या अमानुष लाठीहल्ला आणि दडपशाहीच्या निषेधार्थ आज संगमनेर शहर पूर्णपणे दणाणून गेले. ज्येष्ठ काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सर्व समविचारी पक्षांच्या वतीने संगमनेरमध्ये एक अभूतपूर्व आणि ‘विराट मशाल मोर्चा’ काढण्यात आला. केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखाने मागणी या वेळी करण्यात आली.

​संगमनेर बस स्थानक येथून मोर्चाची सुरुवात झाली. या वेळी हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक हातात मशाली आणि केंद्र सरकारच्या विरोधात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर चावडी मार्गे हा भव्य मोर्चा महात्मा फुले स्मारकापर्यंत पोहोचला.

​मोर्चाच्या समाप्तीनंतर महात्मा फुले स्मारकाजवळ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ​ते म्हणाले, “सोनम वांगचुक हे देशातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व असून, विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हक्कांसाठी गेल्या २१ दिवसांपासून त्यांचे जंतर-मंतरवर शांततापूर्ण उपोषण सुरू आहे. मात्र, सत्तेचा प्रचंड अहंकार झालेल्या केंद्र सरकारला हा आवाज ऐकू येत नाही. लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन लाठीहल्ल्याने अमानुषपणे दडपणे ही थेट हुकूमशाही आहे.” असे केंद्र सरकारला सुनावले.

​संसदेत आणि रस्त्यावर जनतेचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत थोरात पुढे म्हणाले, “संसदेत विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला असता त्यांचीही अमानुषपणे धरपकड करण्यात आली. आज देशात न्यायालय, स्वायत्त संस्था आणि प्रसारमाध्यमांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. जाती-धर्माच्या नावाने राजकारण करून युवकांचे भविष्य धोक्यात आणले जात आहे. ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आता देशातील तरुणांनी पुन्हा एकदा एकजुटीने संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे.” असे आवाहन केले.

दरम्यान, ​या मोर्चात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. रंजना गवांदे, सौ. दुर्गाताई तांबे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब घोडके यांच्यासह समविचारी पक्षांचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !