अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

संगमनेर Live
0
अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

◻️ पोलीस आणि सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न होणार साकार

संगमनेर LIVE (​अकोले) | पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी येथे अनुसूचित जमातीतील मुलींसाठी चार महिन्यांचे निवासी व मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

​अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना पोलीस आणि सैन्यदलात संधी मिळावी, या उद्देशाने ‘पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी (ता. अकोले)’ येथे विशेष भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​प्रवेशासाठी उमेदवारांनी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवारांचे वजन किमान ५० कि.ग्रॅ. आणि उंची किमान १६५ से.मी. असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये १६०० मीटर धावणे (५० गुण) आणि लेखी परीक्षा (५० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित केला जाईल.

​इच्छुक उमेदवारांनी ९ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत ऑफलाईन अर्ज भरून प्रशिक्षण केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यानंतर, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता उमेदवारांनी १२ वी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी किंवा अधिवास प्रमाणपत्र, चार पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्र यांसह मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी केंद्रावर उपस्थित राहावे. 

दरम्यान, या प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !