जिल्ह्यात रस्ते अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

संगमनेर Live
0
जिल्ह्यात रस्ते अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

◻️ शिवसेनेचे अभिजीत पोटे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही सुरू

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण चिंतेची बाब असून, याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रस्ता सुरक्षेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

​जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अपघात प्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट्स), धोकादायक वळणे आणि महामार्गांवरील त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. या बैठकीत शिवसेना नेते अभिजीत पोटे यांनी जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेचे गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

​बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, महामार्गांवरील अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील रस्ते व वळणांवर आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बोर्ड, दिशादर्शक फलक आणि स्पीड ब्रेकर्स बसवण्यासोबतच एमआयडीसी येथील प्रलंबित फ्लायओव्हरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि विद्युत खांबांचे स्थलांतर करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

​बैठकीत प्रवरा संगम परिसरातील वाहतूक समस्या, पुलांवरील सुरक्षा आणि शहरांतर्गत वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व संबंधित विभागांना निश्चित कालावधीत काम पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ​या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, संजय वाघ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, प्रशासन आता या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी किती तत्परता दाखवते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !