नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आरोप

संगमनेर Live
0
नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आरोप

◻️ पाणीपुरवठा योजनेच्या आरोप-प्रत्यारोपामूळे संगमनेरचे राजकीय वातावरण तापले

​संगमनेर LIVE | निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली असून, यामुळे शहरवासीयांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळत आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे राजकीय वैफल्यग्रस्ततेतून नवीन लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक योजनेवर अत्यंत चुकीचे व खोटे आरोप करून संगमनेरच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी बोचरी टीका माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केली.

आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत संगमनेर पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सौ. दुर्गाताई तांबे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून सविस्तर भूमिका मांडली.

सौ. तांबे यांनी स्पष्ट केले की, या योजनेला २००९ मध्येच नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि जीवन प्राधिकरणाची अधिकृत मंजुरी मिळाली होती. लोकसभा व विधानसभेची आचारसंहिता लक्षात घेता, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच हे काम हाती घेण्यात आले होते. योजनेचे काम दर्जेदार झाले असून, त्यानंतर ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करूनच संबंधित कंत्राटदाराची बिले अदा करण्यात आली आहेत. सर्व विभागांच्या नियमांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्यभरात संगमनेरचा विकास ‘संगमनेर ब्रँड’ म्हणून ओळखला जातो. या विकासाचे श्रेय विरोधकांना पचत नसल्यानेच विधानसभेसारख्या पवित्र सभागृहात अपूर्ण माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सौ. तांबे यांनी केला. “आतापर्यंत शहर व तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी न आणणारे लोक केवळ बदनामीचे काम करत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या चौकशीतून सर्व सत्य समोर येईल आणि खोटे आरोप करणारे लोकच तोंडावर पडतील, असा विश्‍वास सौ. तांबे यांनी व्यक्त केला. संगमनेर शहराची शांतता आणि विकास अबाधित असून, विरोधकांच्या या अशा आरोपांना जनता चोख उत्तर देईल, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !