पालकमंत्री विखे पाटलांच्या हस्ते ७३५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप सुपूर्त
◻️ अहिल्यानगरचा कृषी विभाग ‘पेपरलेस’च्या दिशेने!
संगमनेर LIVE (लोणी) | कृषी विभागाचा कामकाज अधिक गतीमान पारदर्शी आणि कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून जिल्ह्यातील ७३५ कृषि अधिकाऱ्याना लॅपटाॅपची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
राज्यातील महायुती सरकारने सर्वच विभाग पेपरलेस करण्याचे धोरण घेतले असून ई-गव्हर्नन्सला अधिक बळ देण्याचे धोरण घेतले आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने मंडल कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी आणि सहाय्यक कृषि अधिकारी यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला होता. क्षेत्रीय स्तरावर काम करताना अधिकार्यांना कृषि विभागाच्या सर्व योजना आणि माहीती शेतकऱ्यांना थेट गावामध्येच देता येण्याच्या दृष्टीने लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषि अधिकार्यांना लॅपटाॅप उपलब्ध होण्याकरीता पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुराव्यामुळे जिल्ह्यातील ४९ मंडल कृषि अधिकारी, ९८ उप कृषि अधिकारी आणि ५८८ सहाय्यक कृषि अधिकाऱ्याना लॅपटाॅप उपलब्ध झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृषि अधिकार्यांना लॅपटाॅप सुपूर्त करण्यात आले.
सद्य परिस्थितीत प्रशासनाच्या सर्वच विभागात डिजीटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाचे कामकाजही त्याच पध्दतीने अधिक गतिमान व्हावे असा प्रयत्न सुरू झाला आहे. पीक पाहाणी ऑनलाईन नोंदी लाभार्थी माहीती व्यवस्थापन अहवाल आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन होण्यासाठी अधिकारी या व्यवस्थेचा उपयोग करून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले असून, त्यांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्याना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिल्या आहेत.