◻️ भर पावसात कोपरगाव ते लोणी पायी प्रवास; आईच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
संगमनेर LIVE (लोणी) | आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत. अशा काळात राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील विठ्ठलनगर परिसरातील रहिवासी दीपक धरमसिंग डूलगच यांनी आपल्या आईच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अनोख्या कावड यात्रेने सर्वांचे हृदय जिंकले आहे.
लोणी पोलीस ठाण्यात अंशकालीन सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपक डूलगच यांनी आपल्या आई मालनबाई धरमसिंग डूलगच यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा संकल्प केला होता. कोपरगाव येथील गोदावरीचे पवित्र जल आणून त्या जलाने आईची पूजा करण्याचा त्यांचा मानस होता. मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रवासातील असंख्य अडचणींची पर्वा न करता, दीपक यांनी श्रध्दा आणि आईवरील निस्सीम प्रेमाच्या जोरावर कोपरगाव ते लोणी हा पायी प्रवास पूर्ण केला.
लोणी येथे पोहोचल्यावर दीपक यांनी कावडीतून आणलेल्या पवित्र जलाने आईची पूजा केली. त्यानंतर तिचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. आईप्रती असलेल्या या जिव्हाळ्याच्या क्षणाने उपस्थित नातेवाईक, नागरिक आणि आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
यावेळी दीपक यांच्या या मातृभक्तीचे लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस निरीक्षक आशिष कुमार चौधरी आणि सर्व कर्मचारी वर्गाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमाबाबत बोलताना दीपक डूलगच म्हणाले, “आईचे ऋण सात जन्मातही फेडता येणार नाही. जगात देव शोधण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद हेच खरे तीर्थ आहे.” असे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे म्हणाले, “कर्तव्य बजावत असतानाच संस्कार आणि मातृभक्ती जपणारा दीपक यांचा उपक्रम तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.” असे नमूद केले.
दरम्यान, या अनोख्या उपक्रमाची परिसरात सध्या मोठी चर्चा असून, प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांप्रती प्रेम आणि कृतज्ञता कृतीतून व्यक्त करावी, असा मोलाचा संदेश या घटनेतून मिळत आहे. अशी माहिती पत्रकार अफसर शेख यांनी कळवली आहे.