चहा पिण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली
◻️ आश्वी येथील घटना; पोलिसांत दोघांविरुध्द गुन्हा दाखल
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | आश्वी परिसरात दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली असून, एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातून एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास आश्वी-प्रतापपूर रस्त्यावरील आंधळे पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली.
पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला गंगाधर चतुरे (वय ७०, रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) या आंधळे पेट्रोल पंपाजवळ चहा विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्या दुकानात असताना, दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी चहा पिण्याच्या बहाण्याने तेथे आले. त्यांनी दुकानात गर्दी नसल्याचा फायदा घेत शकुंतला यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किंमतीची व एक तोळा वजनाची सोन्याची पोत (दहा ते १२ वर्षांपूर्वी विकत घेतलेली) बळजबरीने हिसकावून घेतली आणि क्षणात दुचाकीवरून पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शकुंतला चतुरे यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर १६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आश्वी परिसरात आणि वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.