‘डॉन को पकडना नामुमकिन था पण, लंकेनी केले असेल तर त्यांना रॉचे प्रमुख करा!’

संगमनेर Live
0
‘डॉन को पकडना नामुमकिन था पण, लंकेनी केले असेल तर त्यांना रॉचे प्रमुख करा!’

◻️ डॉ. ​सुजय विखे पाटलांचा खासदार निलेश लंकेंवर उपरोधिक टोला


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना खासदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा निलेश लंके यांनी केला होता. या दाव्यावरून अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत उपरोधिक हल्ला चढवला आहे.

​एका कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्या दाव्याची जोरदार खिल्ली उडवली. “डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था।, परंतु ही गोष्ट जर खासदारांनी करून दाखवली असेल, तर त्यांना नक्कीच 'रॉ'चे प्रमुख केले पाहिजे," असा खोचक टोला त्यांनी खासदार लंकेना लगावला. 

पुढे बोलताना विखे म्हणाले की, जर खासदारांचे कार्यकर्तेच गुन्हेगारांचा शोध घेत असतील, तर आता सीबीआय आणि रॉसारख्या देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणांचे नेतृत्वच खासदारांकडे सोपवण्याची वेळ आल्याचे म्हणत खरपूस टीका केली.

​आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाचा सविस्तर लेखाजोखा मांडला. नगर जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण करून जिल्ह्याचा कायापालट करण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

​दरम्यान, नागरिकांमध्ये असंतोषाचे कारण ठरलेल्या नगर–मनमाड महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत विखे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करत कामातील दिरंगाई मान्य केली. महामार्गाचे काम रेंगाळण्यामागील तांत्रिक व जागतिक कारणे सांगताना ते म्हणाले की, सध्या निर्माण झालेल्या जागतिक युध्दजन्य परिस्थितीमुळे डांबराचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा थेट परिणाम महामार्गासह इतर रस्त्यांच्या बांधकामावर झाला आहे.

नगर-मनमाड ​महामार्गाच्या संथ कामावरून सुरू असलेले राजकारण आणि सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देताना विखे यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून प्रसिध्दी मिळवणे हा या समस्येवरचा अंतिम उपाय असू शकत नाही. जागतिक अडचणींमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मात करून काम वेगाने पूर्ण करण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेवटी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !