स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस - आमदार खताळ
◻️ धांदरफळ खुर्द येथे स्वातंत्र्यदिनी स्वखर्चातून कायमस्वरूपी स्टेज उभारण्याची घोषणा
संगमनेर LIVE (अनिल शेळके)| “ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या परकीय सत्तेतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. त्यांच्या या महान त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात सुखाने जीवन जगत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा केवळ एक उत्सवाचा दिवस नसून, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील ग्रामविकास सेवा संघ संचलित श्री. बी. जे. खताळ जनता विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष भास्कर खताळ, उपाध्यक्ष शंतनू मुळे, सचिव विजय खताळ, खजिनदार वैशाली मुळे, ज्येष्ठ नेते मुरलीधर खताळ, सरपंच लता खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे, ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ, सतीश कोकणे, रूपाली खताळ, रामनाथ देवगिरे, अण्णासाहेब गोडसे, रोहिदास खताळ यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर संविधान आणि लोकशाहीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध झाली आहे. भारतामध्ये विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे अनेक रंग असले तरी देशाची एकात्मता आणि अखंडता हीच आपली खरी ताकद आहे. आज जागतिक पातळीवर भारताचा सन्मानाने उल्लेख केला जात असून देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे.”
तसेच, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवेची कास धरून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या युगात पर्यावरणाचा समतोल राखणे, पाणी बचत करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटलावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे माजी मंत्री स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांच्या स्मृतींना आमदारांनी उजाळा दिला. “आजही महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना स्व. खताळ पाटील यांच्या विकासकामांचा आवर्जून उल्लेख होतो. आपल्या गावाचे भूषण आणि मार्गदर्शक म्हणून त्यांच्या कार्याचा आम्हाला सदैव अभिमान आहे,” असे आमदार म्हणाले.
“शाळेच्या विकासासाठी माझ्याकडून अजून बरेच काम बाकी आहे. पुढील वर्षी शाळेसाठी आवश्यक असलेले कायमस्वरूपी स्टेज स्वतःच्या वैयक्तिक निधीतून उभारणार आहे. जागेचा प्रश्न आता सुटला असून, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी परिसरातील पालक आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असते; मात्र समाजकारण आणि विकासाचे काम अविरत सुरू राहिले पाहिजे.” असे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी नमूद केले.