पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार जागरूक ठेवणे आवश्यक - प्रा.राम शिंदे
◻️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २३१ वी पुण्यतिथी साजरी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून लोककल्याण, न्याय, समता, महिला सक्षमीकरण, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच त्यांच्या विचारांची जागरूकता समाजात कायम ठेवणे ही काळाची गरज असल्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २३१ वी पुण्यतिथी समारोह चौंडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळत जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजेच्या सुख-दुःखाची जाण ठेवणाऱ्या या लोकमातेने सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचा आदर्श ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, गरजूंच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. प्रशासनात पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता असावी, हा संदेश त्यांच्या कार्यातून आजही मिळतो असेही ते म्हणाले.
नव्या पिढीला अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे, वाचन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ‘लोककल्याण हेच खरे नेतृत्व’ हा संदेश समाजमनात रुजविणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे केवळ इतिहासाचा वारसा नसून आजच्या आणि उद्याच्या समाजासाठी मार्गदर्शक मूल्ये आहेत. न्याय, सेवा, संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाची भावना जागृत ठेवून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. डांगे यावेळी म्हणाले की, अहिल्यादेवींनी देशाच्या विविध भागांतील धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठीही मोठे योगदान दिले. मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा, रस्ते आणि यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधांची उभारणी करून त्यांनी सार्वजनिक हिताची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. समाजातील विविध घटकांना जोडण्याचे आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे त्यांचे कार्य आजही महत्त्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले.