राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी संगमनेरमधून दोन हजार विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना!

संगमनेर Live
0
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी संगमनेरमधून दोन हजार विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना!

◻️​ “झेन जी पिढीचा आवाज दडपू नका” - डॉ. जयश्री थोरात


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या पुणे येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी संगमनेर तालुका युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुक्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना झाल्या आहेत.

​यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून या सर्व विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘विद्यार्थी एकतेचा विजय असो’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ आणि ‘छात्रों की गूंज सरकार को सुननी पडेगी’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

​खासदार राहुल गांधी हे ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील युवकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी, बेरोजगारी आणि इतर प्रश्न केंद्र व राज्य सरकारसमोर मांडत आहेत. या संवाद अभियानाला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता पसरली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

​काल पुण्यामध्ये शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला असून या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करत “यात विद्यार्थ्यांचा काय दोष?” असा सवाल सरकारला विचारला. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

या प्रसंगी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार मोहन जोशी यांसह काॅग्रेसचे विविध ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे युवक काॅग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांनीही जखमी विद्यार्थ्यांना धीर देत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व “सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबू शकत नाही, विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय्य हक्क द्यावाच लागेल,” असा कडक इशारा सरकारला दिला.

दरम्यान, ​पुणे येथील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारामुळे संगमनेरच्या विद्यार्थिनींना थेट राहुल गांधींशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. विद्यार्थिनींचा अभूतपूर्व उत्साह व घोषणाबाजीमुळे संगमनेरचा आवाज पुणे शहरात निश्चितच घुमणार आहे.

​“शिष्यवृत्तीचा रास्त प्रश्न मांडणाऱ्या पुणे येथील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न दडपण्याऐवजी ते समजून घेतले पाहिजेत. ही आजची ‘झेन जी’ पिढी आहे, त्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. खासदार राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला देशभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांमधील प्रचंड उत्साह आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि यशस्वी ठरेल.” अशी प्रतिक्रिया डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !