धक्कादायक! ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

संगमनेर Live
0
धक्कादायक! ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

◻️ संगमनेरमध्ये उपचार सुरू; पालकमंत्र्यांसह आमदार खताळ यांनी घेतली माहिती 


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. या हल्ल्यात अंकुर प्रशांत कोटकर हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंकुर घराजवळ असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झेप घेतली. बिबट्याने थेट चिमुकल्याच्या डोक्याचाच ताबा घेत चावा घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

​घटना घडताच कुटुंबीयांनी आणि उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रचंड आरडाओरड केली. लोकांचा आक्रोश पाहून बिबट्याने घाबरून चिमुकल्याला सोडून घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे बालकाचे प्राण वाचले असले तरी डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

​जखमी अंकुरला कुटुंबीयांनी तातडीने सुगाव येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, डोक्याची जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील तातडीच्या उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे.

​या घटनेचे गांभीर्य ओळखून औरंगपूर (ता. संगमनेर) येथील चिमुकल्याचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते सुमित डेंगळे यांनी तात्काळ पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली. यावर दोन्ही लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेत रुग्णालय प्रशासनाला चिमुकल्याला सर्वोत्कृष्ट व वेळेवर वैद्यकीय उपचार पुरवण्याचे आदेश दिले, तसेच वनविभागाने परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा व इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचनाही दिल्याची माहिती, सुमित डेंगळे यांनी दिली.

दरम्यान, ​या घटनेमुळे कुंभेफळ व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !