डीवायएसपी अजित त्रिपुटे यांना गृह मंत्रालयाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर!
◻️ प्रदीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; अहिल्यानगर पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पोलीस दलातील प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), अहिल्यानगरचे पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अजित बाळकृष्ण त्रिपुटे यांना केंद्रीय गृह विभागाच्या वतीने अत्यंत मानाच्या ‘उत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे अहिल्यानगर पोलीस दलासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत खामगाव (जि. बुलढाणा), अमरावती, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, रत्नागिरी आणि मुंबई येथे विविध पोलीस ठाणी, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), जिल्हा विशेष शाखा, संगणक कक्ष, नागरी हक्क संरक्षण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली आहे.
कोल्हापूर आणि अमरावती जिल्ह्यात गुन्हे शाखेत कार्यरत असताना अजित त्रिपुटे यांनी आपल्या तपास कौशल्याचा आणि तांत्रिक ज्ञानाचा उत्तम वापर केला. या कालावधीत त्यांनी खून, दरोडा, जबरदस्तीने चोरी आणि घरफोडी यांसारख्या अत्यंत गंभीर व किचकट गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून आरोपींना गजाआड केले. विशेषतः चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील व गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून मुख्य आरोपींना अटक करण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच गोकुळ-शिरगाव येथील स्फोटक पदार्थांशी संबंधित गुन्ह्याची तांत्रिक तपासाच्या माध्यमातून यशस्वी उकल करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
गुन्हे तपासासोबतच प्रशासकीय कामकाज आणि सामाजिक समन्वयातही त्यांनी आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेष शाखेत असताना २०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ‘निवडणूक कक्ष अधिकारी' म्हणून शिस्तबध्द नियोजन केले. याशिवाय, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीच्या काळात पोलीस प्रशासन आणि वारकरी संप्रदाय यांच्यात सुसंवाद व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ‘समन्वय अधिकारी' म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना भ्रष्टाचाराविरोधात धडक कारवाया करत शासकीय कारभारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्रिपुटे यांच्या या उत्कृष्ट सेवेचा यापूर्वीही अनेकदा गौरव करण्यात आला आहे. सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट तपास अधिकारी’ पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रदान करण्यात आला होता, तर सन २०२० मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह व पदक त्यांना प्राप्त झाले आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ मिळाल्यामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान, त्यांची कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात असून पुढील सेवेसाठी त्यांना संगमनेर लाईव्ह परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!