पुढील श्रावणापर्यंत निझर्णेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार पूर्ण करणार - आमदार अमोल खताळ
◻️ आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक केली निझर्णेश्वर महादेव मंदिरात महापूजा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री निझर्णेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने विकासकामांत निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी लवकरच दूर केल्या जातील. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनविभागाची जागा मंदिर परिसरासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते कोकणगाव शिवापूर (ता. संगमनेर) शिवारातील श्री निझर्णेश्वर महादेव मंदिरात पारंपरिक महाअभिषेक, पूजा आणि आरती संपन्न झाली. या प्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.
आपल्या भाषणात आमदार खताळ म्हणाले की, “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निझर्णेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा शासकीय निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंदिराची मूळ वास्तू जुनी झाल्यामुळे सर्व ग्रामस्थ, देवस्थानचे विश्वस्त आणि भाविकांच्या सहमतीने मंदिराच्या जीर्णोध्दाराचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांचे योगदान, ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासकीय मदत यांचा योग्य समन्वय साधून हे काम पूर्णत्वास नेले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “निझर्णेश्वर मंदिर हे संपूर्ण तालुक्यातील भाविकाचे श्रध्देचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या धार्मिक स्थळाचा विकास करताना परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. विकासकामांना गती देण्यासोबतच भाविकांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल. येत्या वर्षभरात म्हणजेच पुढील वर्षीच्या श्रावण महिन्यापर्यंत जीर्णोध्दाराचे काम पूर्ण होईल. त्यानंतर शिवभक्तांना नव्या मंदिरात दर्शनाचा लाभ घेता येईल.” असे देखील त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रसंगी निझर्णेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे बबन पवार, दिलीप जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, गंगाधर वायकर, नंदू पानसरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिसरातून आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.