जिल्हा पोलीस दलातील ३० अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक प्रदान!
◻️ स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या हस्ते वितरण आणि गौरव
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भारत सरकारकडून पोलीस दलात प्रदीर्घ व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिल्या जाणाऱ्या मानाच्या सेवा पदकांचे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील ३० जणांना औपचारिक वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात पार पडलेल्या विशेष समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.
केंद्र सरकारतर्फे २५ वर्षे उत्कृष्ट सेवा कालावधीकरिता ‘दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक' आणि १५ वर्षे अखंड सेवेकरिता ‘उत्कृष्ट सेवा पदक' देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा सन्मान केला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यातून यावर्षी विविध श्रेणीत निवड झालेल्या ३० पोलीस अधिकारी व अंमलदारांना हे पदक प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर शहर पोलीस उपअधीक्षक डाॅ. दिलीप टिपरसे, नगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित विशेष गौरव सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार थोरात, पोलीस उपनिरीक्षक संपतराव खैरे, शैलेश उपासने, अन्वरअली सय्यद, मनोहर शेजवळ, संजय खंडागळे व किरण शेलार तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे आणि किरण शेलुकर यांना मानाचे पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच पोलीस हवालदार सचिन पवार, रेहान शेख, कृष्णा कुऱ्हे, दिगंबर कारखिले, रंगनाथ नरसाळे, मल्लिकार्जुन बनकर, कृष्णा विधाटे, राजू सुद्रिक, संदीप पवार, संतोष ओव्हळ, सचिन जाधव, दीपक घाटकर, अभिजित अरकल, सुयोग सुपेकर, सुरेश माळी, माधुरी तोडमल, कीर्ती कांजवणे, भाग्यश्री भिटे, राहुल सोळुंके आणि अमोल घुले यांनाही प्रशस्तीपत्र व पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
दरम्यान, पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या या ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानामुळे संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून, सर्व स्तरांतून पदक विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.