प्रवरा अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
◻️ कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते अवयव दात्यांचा सत्कार
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस (प्रवरा अभिमत विद्यापीठ), लोणी येथे स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात पार पडला. विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या अवयव दात्यांचा करण्यात आलेला विशेष सन्मान.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत साखरबाई बन्सी गागरे, मंगल भीमराव उकांडे, अनिता गणेश बळी, गंगुबाई हरिभाऊ पिंगळे आणि चंद्रकला दशरथ कांदळकर या अवयव दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अवयव दात्यांचे आभार मानले. ते म्हणाले, अवयव दाते हे समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या निःस्वार्थ त्यागामुळे आणि धैर्यामुळे आज अनेकांना जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या या पवित्र कार्यातून संपूर्ण समाजाला अवयवदानाची मोठी प्रेरणा मिळेल.
देशभक्तीच्या या महोत्सवात विद्यापीठातील अंतर्गत मैदानी खेळांच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचाही विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
या सोहळ्यासाठी प्रवरा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, संचालक मेजर जनरल योगींदर सिंग, वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. सुनिल बुलार यांच्यासह सर्व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.