गुणवत्तेच्या बळावर ‘अमृतवाहिनी विद्यापीठ’ देशात अग्रगण्य ठरेल - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
गुणवत्तेच्या बळावर ‘अमृतवाहिनी विद्यापीठ’ देशात अग्रगण्य ठरेल - बाळासाहेब थोरात

◻️ ​अमृतवाहिनी विद्यापीठाचा डिजिटल फलक व संकेतस्थळाचे अनावरण

​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रोपलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल नेहमीच उच्च गुणवत्तेवर आधारित राहिली आहे. जगातील वेगवान बदलांनुसार आधुनिक आणि नवीन अभ्यासक्रमांची गरज ओळखून स्थापन झालेले 'अमृतवाहिनी विद्यापीठ' येत्या काळात आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ ठरेल, असा ठाम विश्‍वास काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 'अमृत कला मंच' येथे आयोजित भव्य सोहळ्यात अमृतवाहिनी विद्यापीठाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डिजिटल रिमोटद्वारे विद्यापीठाचा अधिकृत फलक आणि नवीन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

​सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत यासाठी सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था आणि पुढे उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. गेल्या ४९ वर्षांच्या या समृध्द वाटचालीत या संस्थेचा मोठा वटवृक्ष झाला असून, गुणवत्तेच्या जोरावर अमृतवाहिनीने देशभरात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी देशात व परदेशात उच्च पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.

​जगामध्ये वेगाने होणाऱ्या बदलांशी सुसंगत असे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी विद्यापीठाने जगभरातील नामवंत विद्यापीठांशी समन्वय साधला आहे. संस्थेची ही गुणवत्ता लक्षात घेऊनच शासकीय महाविद्यालयांनंतर राज्यातील पालकांची प्रवेशासाठी अमृतवाहिनीला पहिली पसंती मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कृषी महाविद्यालय यशस्वीपणे सुरू असून आता ‘फूड टेक्नॉलॉजी’ हे नवीन महाविद्यालयही सुरू करण्यात आले आहे. तसेच सध्या बी.टेक आणि एम.टेक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून पालकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

​मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा आणि विधानपरिषद या सर्व स्तरांवर विद्यापीठासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण झाल्याने यास मंजुरी मिळाली आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कुलपती थोरात यांनी सांगितले की, येत्या ५ वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा जागतिक दर्जाचा परिसर उभा राहिल. गुणवत्तेचे हे वैशिष्ट्य कायम ठेवत आगामी काळात अमृतवाहिनी विद्यापीठ देशातील सर्वात मोठे व लौकिकप्राप्त विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !