ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात समाज एकत्र आणण्याची ताकद - मंत्री विखे पाटील
◻️ धनगरवाडी येथील १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाला पालकमंत्र्याची भेट
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात केवळ भक्ती नाही तर समाजला एकत्र आणण्याची शक्ती आहे. अखंड हरिनाम सप्ताहातून संत परंपरेचा विचार पुढच्या पिढीपर्यत पोहचविण्याचे काम महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
धनगरवाडी येथे सुरू असलेल्या सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भेट दिली. महंत रामगिरी महाराज यांचे पूजन करून त्यांनी उपस्थित लाखो भाविकांशी संवाद साधला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, राजेंद्र लहारे, सरपंच गोपीनाथ धनगरवाडी, नानासाहेब शिंदे याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, सप्ताहाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा अध्यात्मिक आनंद असतो. सलग १७९ वर्षाची परंपरा महंत नारायणगिरीजी महाराजांनतर महंत रामगिरीजी महाराज पुढे घेवून जात आहे. मनाला शुध्द करण्याचा आणि विचारांना दिशा देणारा एक अध्यात्मिक उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला मनशांतीची गरज आहे. त्यामुळेच भगवंताचे नामस्मरण आशा सप्ताहातून मनाला आनंद देत असल्याचे सांगून नामदार विखे पाटील यांनी सांगितले की या सप्ताहाचे अध्यातमिक अधिष्ठान खूप मोठे असल्याने समाजाच्या पाठबळावर आणि योगदानातून यशस्वी होणारा सप्ताह भारतातील एकमेव उदाहरण आहे.
महंत रामगिरी महाराजांच्या सप्ताहात सहभागी होवून दरवर्षी लाखो भाविक करीत असलेल्या संकल्प यशस्वी होतो. त्यामुळेच समाजापुढे सध्या व्यसनाधिनता आणि गोहत्या बंदीच्या अंमलबजावणीचे मोठे आहे. यासाठी समाजाला पुढाकार घ्यावा लागणार आहे.
गोमाता ही आपली राष्ट्रमाता आहे. गोमातेचे संरक्षण म्हणजे राष्ट्राचे संरक्षण करण्यासारखे आहे. राज्य सरकारने गोहत्या बंदीचा कायदा केला. पण अद्यापही गोहत्येच्या सुरू असलेल्या घटना रोखायच्या असतील तर समाजला एकत्रित येवून यासाठी काम करावे लागेल. व्यवसमुक्त समाज आणि गोहत्या हत्या बंदीसाठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
महंत रामगिरीजी महाराज यांनी सप्ताहाच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी रस्त्याच्या कामाकरीता उपलब्ध करून दिलेल्या चार कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करून त्यांच्या सहकार्यांने सप्ताह यशस्वी होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, सप्ताह स्थळी उभारण्यात आलेल्या पालकमंत्री वैद्यकीय कक्षास महंत रामगिरी महाराज आणि मंत्री विखे पाटील यांनी भेट देवून तिथल्या व्यवस्थेची पाहाणी केली.