‘गरुडझेप मोहिमे’चे संगमनेरात आमदार अमोल खताळांकडून स्वागत!
◻️ शिवरायांच्या आग्रा सुटकेला ३६० वर्षे पूर्ण; आग्रा ते राजगड १ हजार ३१० किमी प्रवास
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आणि थरारक आग्रा सुटकेला ३६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘गरुडझेप मोहिमे'चे संगमनेर शहरात शिवप्रेमींनी प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. आग्रा ते राजगड असा तब्बल १ हजार ३१० किलोमीटरचा प्रवास करणारी ही शिवज्योत संगमनेरात दाखल होताच परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील पायदळाचे प्रमुख सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज ॲड. मारुती (आबा) गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक मोहीम काढण्यात आली आहे. आग्र्याहून निघालेल्या या मोहिमेचे संगमनेर तालुक्यात आगमन होताच, घुलेवाडी शिवारातील शिवसर्कल येथे सर्वप्रथम सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते शिवज्योतीचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर शिवप्रेमींच्या अलोट गर्दीत ही मोहीम संगमनेर शहरात दाखल झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवज्योतीचे आगमन होताच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार अमोल खताळ, मोहिमेचे नेतृत्व करणारे ॲड. मारुती गोळे आणि व्याख्याते एस. झेड. देशमुख यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, या भव्य स्वागत सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेकडो शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ , ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण संगमनेर परिसरातील वातावरण अक्षरशः शिवमय झाले होते.