आमदार विवेक कोल्हेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नामोल्लेख टाळला?
◻️ राष्ट्रवादीचे सरुनाथ उंबरकरांकडून आमदार विवेक कोल्हेचा निषेध!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | धनगरवाडी (ता. राहाता) येथे सद्गुरू गंगागिरी महाराजांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तीच्या वातावरणात संपन्न झाला. मात्र, अचानक राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. राज्याच्या महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नामोल्लेख आमदार विवेक कोल्हे यांनी जाणीवपूर्वक टाळल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर यांनी करत आमदार कोल्हे यांचा निषेध केला आहे.
मंगळवारी (दि. २५) सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन आणि सांगता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सप्ताहासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक उपस्थित होते.
यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी ‘महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अधिनियम २०२६’ या शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी अत्यंत हिताच्या ठरणाऱ्या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख करत त्यांचे आभार मानले.
राज्यात सध्या तीन पक्षांचे महायुतीचे सरकार कार्यरत आहे. मात्र, आमदार विवेक कोल्हे यांनी आभार मानताना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना सोयीस्कररित्या वगळले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचा साधा नामोल्लेखही त्यांनी केला नाही. असा गंभीर आरोप सरुनाथ उंबरकर यांनी करून आमदार कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सरुनाथ उंबरकर म्हणाले की, “कोल्हे कुटुंबाला राजकारणात मोठे करण्याचे काम पवार घराण्याने केले आहे. याची जाण ठेवण्याऐवजी, पवार कुटुंबातील आणि आमच्या पक्षाच्या प्रमुख, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नामोल्लेख टाळण्याचे काम आमदार विवेक कोल्हे यांनी केले. दिवंगत अजितदादा पवार आज हयात असते तर, त्यांना डावलण्याचे धाडस ते करू शकले असते का? आमच्या नेत्यांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. आमदार कोल्हे यांच्या या कृत्याचा मी अत्यंत तीव्र शब्दांत जाहीर निषेध करतो.” अशी घणाघाती टीका केली.