कॉक्रोच जनता पार्टीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियान अहिल्यानगरमध्ये
◻️ पुराव्यांसह अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सोपवण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | कॉक्रोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची जोरदार हाक देण्यात आली आहे. बुधवार (दि. २६ जून) सावेडी, गुलमोहर रोड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील सरकारी शाळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व ऑडिट करण्याचा धडक निर्णय घेण्यात आला आहे. केवळ हवेत आरोप करण्याऐवजी पुराव्यांच्या आधारे प्रशासनाला जाब विचारण्याची नवी रणनीती पक्षाने आखली आहे.
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्रत्यक्षात आहेत की केवळ कागदावर, याचा आता ग्राउंड लेव्हलवर जाऊन आढावा घेतला जाणार आहे. या अभियानांतर्गत पक्षाचे कार्यकर्ते शाळेची इमारत, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, पंखे, परिसराची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि खेळाचे मैदान यांसारख्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणार आहेत.
केवळ समस्या मांडून न थांबता, शाळानिहाय संकलित केलेल्या माहितीचा आणि त्रुटींचा एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल पुराव्यांसह शिक्षणाधिकारी व संबंधित प्रशासनाकडे सादर केला जाईल. प्रशासनासमोर प्रश्न मांडताना तो पुराव्यांसह व वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारेच मांडण्याची ठाम भूमिका या बैठकीत स्पष्ट करण्यात आली. जोपर्यंत शाळांच्या प्रलंबित समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीने राबविलेल्या आंदोलनांच्या यशावर बैठकीत चर्चा करण्यात आली. कोणतेही आंदोलन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच, जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यावरही सविस्तर चर्चा झाली. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, या बैठकीला कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी अक्षय शिंदे, डॉ. नितीन दिघे, ॲड. जयसिंग शेरे, क्षितिज पगार, प्रज्वल कसबे, सागर स्वामी, प्रथमेश दरेकर, सुशील शेळके, महेश सटाले, सागर शेळके, प्रवीण फराटे, प्रथमेश दरवडे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.