बळीराजाच्या सुखासाठी महादेवाला आमदार अमोल खताळ यांचे साकडे
◻️ तिसऱ्या श्रावणी सोमवारी कुटुंबासमवेत विविध शिवमंदिरांत घेतले दर्शन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | यंदा पावसाने काही भागांत ओढ दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतकरी टिकला तरच देशाची अर्थव्यवस्था भक्कम राहील, या भावनेतून सर्वत्र समाधानकारक पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी महादेवाच्या चरणी साकडे घातले. तसेच, बहुचर्चित पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच धावेल, यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी जवळे-बाळेश्वर येथे जाऊन बाळेश्वर महादेवाची विधिवत पूजा व महाअभिषेक केला. त्यानंतर त्यांनी खांडगाव येथील खांडेश्वर-कपालेश्वर, धांदरफळ येथील नागेश्वर, रामेश्वर तसेच कनकेश्वर मंदिरात जाऊन महाआरती केली.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, “भारत हा कृषिप्रधान देश असून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी मुबलक पावसाची गरज असते. यंदा चांगला पाऊस पडावा, शेतशिवारात भरघोस पीक यावे आणि बळीराजासह सर्वांना सुख, समृध्दी व उत्तम आरोग्य लाभावे, हीच प्रार्थना महादेवाकडे केली आहे.”
तालुक्यातील धार्मिक स्थळांचा विकास करणे आणि भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ही आपली जबाबदारी असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले. आपण राजकारण केवळ निवडणुकांपुरतेच करतो. निवडणुका संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून परिसराच्या सर्वांगीण विकासाला आपले प्राधान्य असते. धार्मिक स्थळांचा विकास हा कुठल्या एका समाजाचा विषय नसून तो आपल्या संस्कृतीशी जोडलेला भाग आहे. त्यामुळे याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वे संगमनेरमधूनच!
“मला आमदार होऊन दीड वर्ष झाले आहे. पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागणे गरजेचे होते. तो का रखडला, याची मला माहिती नाही; परंतु ही रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. जीएमआरडीच्या अडथळ्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून, तिला ६० दिवसांची मुदत दिली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत आपण राज्य सरकारवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक - शिर्डी - अहिल्यानगर - पुणे या रेल्वेमार्गाची अधिसूचना जारी झाली आहे, मात्र हा मार्ग पुणे - नाशिक - संगमनेर या प्रस्तावित मार्गापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे संगमनेरकरांनी निश्चिंत राहावे.” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.