‘नाथाभाऊ’ म्हणजे संघर्षातून उभा राहिलेला जनमाणसातला माणूस - बाळासाहेब थोरात
◻️ ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा अमृत महोत्सवी सत्कार; थोरातांनी दिला अनेक दशकांच्या मैत्रीला उजाळा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “माझे परममित्र आणि ज्येष्ठ नेते नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) आपल्या आयुष्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा केवळ वाढदिवसाचा सोहळा नाही, तर त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील संघर्ष, कर्तृत्व, धडपड आणि जनसेवेचा गौरव करणारा हा एक अविस्मरणीय सोहळा आहे," अशा अत्यंत गौरवपर शब्दांत काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नेते आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नाथाभाऊंच्या राजकीय प्रवासाचा आणि त्यांच्या अतूट मैत्रीचा पट उलगडला.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझी आणि नाथाभाऊंची मैत्री अनेक दशकांची आहे. १९८५ मध्ये मी आणि १९९० मध्ये नाथाभाऊ आमदार झालो. त्याच काळात आमची भेट झाली. त्यावेळी पुष्पाताई हिरे मंत्री होत्या. मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी सकाळी फोन करण्यासाठी आम्ही एकत्र बसायचो. त्यातूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. आजपर्यंत आम्ही ही मैत्री तितक्याच जिव्हाळ्याने आणि विश्वासाने जपली आहे.”
नाथाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना थोरात पुढे म्हणाले की, सरपंच पदापासून सुरू झालेली नाथाभाऊंची वाटचाल आज एका मोठ्या उंचीवर पोहोचली आहे. या प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, पण संघर्षाची साथ कधी सोडली नाही.
विशेषतः १९९५ ते १९९९ या काळात जलसंपदा मंत्री म्हणून त्यांची कामगिरी राज्याच्या लक्षात राहिली आहे. 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'ची स्थापना असेल किंवा 'तापी खोरे' विकासाला चालना देणे असेल, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे यासाठी नाथाभाऊ नेहमीच आग्रही राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता मी जवळून पाहिला आहे.
तसेच, आम्ही मंत्री असताना नाथाभाऊ विरोधी पक्षनेते होते. तो काळही वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा होता. विविध विषयांवर सखोल अभ्यास करून तासन्तास प्रभावी भाषणे करण्याची त्यांची क्षमता आणि सभागृहातील त्यांची ठाम मांडणी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे, असेही थोरात म्हणाले.
सरपंचापासून आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असा प्रदीर्घ प्रवास करूनही नाथाभाऊ जनसामान्यांशी जोडलेले राहिले आहेत. ते केवळ राजकारणी नसून जनमाणसातले माणूस आहेत. आज त्यांचा अमृत महोत्सव देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते साजरा होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे थोरात यांनी नमूद केले.
“नाथाभाऊंना पुढील आयुष्य आनंदी, निरोगी, यशस्वी आणि समाधानाचे लाभावे. त्यांना उत्तम आरोग्य लाभून त्यांच्या हातून समाजाची व जनतेची अशीच अविरत सेवा घडत राहावी,” अशी प्रार्थना करत बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.