निमोणमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आमदार खताळांनी केले सारथ्य
◻️ “संतांची परंपरा आणि संस्कार अखंड राहोत"; पादुकांचे दर्शन घेत केली प्रार्थना
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पंढरपूरहून त्र्यंबकेश्वकडे परतीच्या प्रवासात असलेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे निमोण (ता. संगमनेर) येथे अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. निमोण येथील मारुती घुगे यांच्या निवासस्थानी पालखीचा सोहळा विसावला असता, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी उपस्थित राहून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पवित्र पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
या सोहळ्यादरम्यान आमदार अमोल खताळ यांना संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सारथ्य करण्याचे सुभाग्य लाभले. वारकरी संप्रदायाच्या या पवित्र परंपरेत प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अनुभव मनाला अपार समाधान देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भावना व्यक्त करताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “संतांच्या विचारांची आणि भक्तीची ही पवित्र परंपरा अखंड अशीच पुढे चालत राहो. समाजात प्रेम, बंधुभाव, सद्भावना आणि अध्यात्मिक संस्कार अधिक दृढ व्हावेत, हीच संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन संतांच्या विचारांचा वारसा जवळून अनुभवणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने निमोण आणि लगतच्या परिसरात भक्तीचा सलोखा पाहायला मिळाला. परिसरातील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी शिस्तबध्दरीत्या आणि मोठ्या श्रध्देने आणि श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन होताना आमदारांनी स्वागत करण्याची घटना यंदा प्रथमच घडली होती. आमदार अमोल खताळ यांनी पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत केले होते. त्यानंतर आता पंढरपूरचा सोहळा पूर्ण करून त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासात असताना देखील आमदार खताळ यांनी निमोण येथे पालखीचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासातील त्यांची ही उपस्थिती आणि भक्तीभाव ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला.