वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळांची अडवणूक करू नका!

संगमनेर Live
0
वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळांची अडवणूक करू नका!

◻️ आमदार अमोल खताळ यांचे वनअधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | वनविभागाच्या हद्दीत पारंपरिक पध्दतीने मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मेंढपाळांना शासनाने मेंढ्या चारण्यासाठी रीतसर परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे वनहद्दीत चराईसाठी जाणाऱ्या मेंढपाळांची कोणतीही अडवणूक करू नका, असे स्पष्ट आणि सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह मेंढीपालन या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहे. साधारणतः पावसाळा संपल्यानंतर चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन विविध भागात स्थलांतर करत असतात. मात्र, वनहद्दीतून जाताना वनविभागाच्या नियमांमुळे राज्यासह तालुक्यातील मेंढपाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या या अडवणुकीमुळे संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील मेंढपाळ बांधवांनी नुकतीच आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे चराईसाठी परवानगी मिळण्याची मागणी केली होती.

मेंढपाळांच्या या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. सुदैवाने याच दरम्यान, राज्य शासनाने वनहद्दीत मेंढ्या चारण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अध्यादेश जारी केला. या शासनादेशाचा संदर्भ देत, शासनाच्या नियमांनुसार मेंढपाळांना चराईसाठी त्वरित आवश्यक ती परवानगी देण्यात यावी, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला कायदेशीर संरक्षण द्यावे आणि कोणत्याही कारणास्तव त्यांच्या अडचणी वाढवू नयेत, अशा कडक सूचना आमदार खताळ यांनी स्थानिक वनअधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांना निर्देश देण्यासोबतच आमदार खताळ यांनी मेंढपाळांनाही मोलाचा सल्ला दिला आहे. मेंढपाळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य तो समन्वय ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, ​आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे मेंढपाळांच्या चराईचा जटील प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासनाच्या निर्णयाचे आणि आमदारांच्या प्रयत्नांचे तालुक्यातील मेंढपाळ समाजाकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !