अश्विनाथ गड हे हिंदू-मुस्लिम सामाजिक एकतेचे मोठे प्रतीक!
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या हस्ते ‘मानाच्या काठी’ची पूजा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत यंदाची भव्य यात्रा अत्यंत पारंपरिक पध्दतीने आणि उत्साहात पार पडली. हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे एकत्रित श्रध्दास्थान असलेला हा गड खऱ्या अर्थाने सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथून अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीची पूजा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. निमोण येथे होणारे काठीचे स्वागत आणि प्रस्थान हा भाविकांसाठी अत्यंत आनंददायी सोहळा असतो.
अश्विनाथ डोंगर हा पारेगाव बुद्रुक, चिंचोली गुरव, निमोण, देवकवठे यांसह सिन्नर तालुक्यातील अनेक गावांच्या मध्यवर्ती वसलेला आहे. हा गड सर्वदूर भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असून, हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे एकत्र असलेले हे मंदिर संपूर्ण राज्याचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. दर गुरुवारी येथे दोन्ही धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. विशेषतः श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी भरणारी जत्रा ही उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो हिंदू-मुस्लिम भाविकांच्या मांदियाळीने फुलून जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेला हा एकत्रित यात्रेचा पारंपारिक योग आजही तितक्याच श्रध्देने जपला जात आहे.
या यात्रेचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे ‘देवाचा गाडा'. चिंचोली गुरव आणि पारेगाव बुद्रुकचे ग्रामस्थ अत्यंत मानाने हा गाडा काढतात. बैलगाडीने ओढत आणलेला हा रथरूपी गाडा ज्यावेळी यात्रेत प्रवेश करतो, तेव्हा भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “भारत हा विविध संस्कृती, जाती, पंथ आणि धर्मांनी बनलेला देश आहे. ‘विविधतेतून एकता’ हेच आपल्या देशाचे खरे वैशिष्ट्य आहे. या तीर्थक्षेत्रावर सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन श्रध्देने पूजा करतात आणि यात्रा साजरी करतात. एकमेकांप्रती आदर, सहिष्णुता आणि एकात्मता असलेले हे ठिकाण सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण आहे.” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अश्विनाथ गड आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकासकामांमुळे आज हे ठिकाण केवळ एक श्रध्दास्थान न राहता राज्याच्या नकाशावर एक मोठे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे, अशी भावनाही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.