“माझी सभा झाली असती, तर राजाभाऊ नक्कीच आमदार झाले असते!”
◻️ नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत राजाभाऊ कापसे यांना वाहिली श्रद्धांजली!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | राजाभाऊ कापसे यांचे निधनाने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली असून, चळवळीने एक खंदा आणि लढाऊ नेता गमावला आहे, अशी शोकभावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. राहाता तालुक्यातील वाकडी येथे आयोजित श्रध्दांजली सभेत ते बोलत होते.
दिवंगत राजाभाऊ कापसे यांच्या आठवणींना उजाळा देताना नामदार आठवले भावूक झाले होते. ते म्हणाले की, “सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघातून रिडालोसची (रिपब्लिकन डावी लोकशाही समिती) उमेदवारी मी राजा कापसे यांना दिली होती. या निवडणुकीत त्यांनी जोरदार लढत देत तब्बल २३ हजार मते मिळवली. मात्र, ऐनवेळी तांत्रिक कारणामुळे माझे हेलिकॉप्टर श्रीरामपूरमध्ये उतरू शकले नाही आणि माझी प्रचारसभा होऊ शकली नाही. जर त्यावेळी माझी सभा झाली असती, तर राजा कापसे हे निश्चितच बहुमताने निवडून आले असते आणि ते रिपब्लिकन पक्षाचे आमदार झाले असते.”
राजा कापसे यांच्या कार्याचा गौरव करताना नामदार आठवले पुढे म्हणाले की, राजाभाऊ हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व जातीधर्मीयांना मदत करणारे नेते होते. दलित पॅथरच्या काळापासून त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला खंबीर साथ दिली. ते अत्यंत धाडसी आणि रिपब्लिकन चळवळीतील एक आक्रमक नेते होते. जन्मगाव वाकडीपासून सुरू झालेला त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप श्रीरामपूर, अहिल्यानगर, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि राज्यापर्यंत विस्तारला होता. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. असे देखील नामदार आठवले यांनी नमूद केले.
दरम्यान, या आधी नामदार रामदास आठवले यांनी कापसे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.