गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करा - आमदार अमोल खताळ
◻️ गणेशोत्सव आढावा बैठकीत कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सक्त सूचना
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | आगामी गणेशोत्सव संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात निर्विघ्न, सुरक्षित आणि उत्साही वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसावी. गणेश मंडळांना विविध परवानग्या मिळवण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी, असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सोमवारी (दि. ३१) येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वाहतूक, रस्ते, वीजपुरवठा आणि कायदा व सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी प्रशासनाला विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. गणेशोत्सवात मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत खेटे मारावे लागतात, ज्यामुळे कार्यकर्त्यांचा वेळ आणि ऊर्जा वाया जाते. ही गैरसोय टाळण्यासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील अशी 'एक खिडकी योजना' नगरपालिकेने त्वरित कार्यान्वित करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, पावसामुळे शहरातील व उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली असून उत्सव काळात नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका टाळण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घ्यावी.
तसेच रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गणेशोत्सव काळात मंडळांकडून मोठे देखावे आणि कमानी उभारल्या जातात, अशावेळी रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा धोकादायक ठरू नयेत यासाठी महावितरणने अशा ठिकाणांची पाहणी करून दुरुस्ती करावी व संपूर्ण उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.
उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी शहर आणि ग्रामीण भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून संवेदनशील भागात गस्त वाढवावी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी गणेश मंडळांशी योग्य समन्वय साधावा, असे कडक निर्देशही आमदार खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
दरम्यान, या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.