संघर्ष आमच्या रक्तात; मंत्री विखे आणि आमदार खताळांना बाळासाहेब थोरातांचा इशारा
◻️ नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी नागरिकांचे तीन तास ठिय्या आंदोलन!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सरळ व्हावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे हजारो नागरिकांनी एकत्र येत तब्बल तीन तास ठिय्या आणि चक्काजाम आंदोलन केले. नागरिक, महिला व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर घोषणांच्या निनादात दुमदुमून गेला होता. रिमझिम पावसामध्येही हजारो नागरिक तब्बल तीन तास रस्त्यावर बसून राहिल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली, तर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संगमनेर आणि अकोले तालुक्यातून आलेल्या सर्वपक्षीय नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी व शेतकरी वर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. “रेल्वे आमच्या हक्काची, नाशिक-पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे,” अशा जोरदार घोषणा देत तरुणाईने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी गांधी टोपी परिधान करत तीव्र विरोध दर्शवला. प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
आंदोलनाचे नेतृत्व करताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. सन २०१९ मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर याला गती मिळाली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या या सरळ मार्गासाठी सर्व अधिकृत मान्यता मिळालेल्या आहेत. राज्य सरकारने १ हजार कोटी रुपये दिल्यानंतर भूसंपादनही सुरू झाले. मात्र, गोल्डन कॉरिडॉरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रेल्वेचे काम अचानक थांबण्याचे नेमके कारण काय? या चांगल्या कामात कोणी खोडा घातला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “जेथे रेल्वेचे काम थांबले, तिथूनच ते तात्काळ सुरू करा," अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता थोरातांनी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी संत साईबाबांचा आशीर्वाद असतो, त्यात कोणी राजकारण करू नये, असा टोला लगावला. तर, काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही असे म्हणत आमदार अमोल खताळ यांच्यावर देखील नाव न घेता निशाणा साधला. तसेच, वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त करत, “समिती नेमून जर पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार असेल, तर झालेले काम वाया जाईल. समिती आली म्हणजे धोका आहे आणि हा खेळ जनतेच्या भावनेशी व विकासाशी खेळण्यासारखा आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या सरळ रेल्वे मार्गामुळे देशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार असून येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या व विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यातील पिढ्यांच्या हिताच्या या प्रकल्पात कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केले. या आंदोलनात पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
“संघर्ष आमच्या रक्तात आहे, स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आम्हाला लाभला असून आम्हाला अटकेची भीती नाही. सरकारने न्यायबुद्धीने काम करावे आणि हा रेल्वे मार्ग सरळच झाला पाहिजे.” असे देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत.