गाईला आजारपणात सोडले वाऱ्यावर; कोंची घाटात तडफडून दुर्दैवी अंत

संगमनेर Live
0
गाईला आजारपणात सोडले वाऱ्यावर; कोंची घाटात तडफडून दुर्दैवी अंत

◻️​ संगमनेर - लोणी मार्गावरील धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​ज्या गाईने आयुष्यभर दुध देऊन जगविले, तिच गाय आजारी पडल्यानंतर तिला मदतीचा हात देण्याऐवजी मरणाच्या दारात नेऊन सोडल्याची हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना संगमनेर-लोणी मार्गावरील कोंची घाटात उघडकीस आली आहे. उपचार तर दूरच, परंतु साधे पाणीही न मिळाल्याने या मुक्या जीवाचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची घाटातील निर्जन ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने या आजारी गाईला वाहनातून आणून खाली उतरवले. ती पळून जाऊ नये म्हणून तिचे पाय दोरीने झाडाला बांधून तो व्यक्ती तेथून पसार झाला. अत्यवस्थ स्थितीत असलेल्या या गाईने झाडाला बांधलेल्या अवस्थेतच उठण्याचा अन् स्वतःचा बचाव करण्याचा असहाय्य प्रयत्न केला. मात्र, निर्जन रस्ता आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने अखेर तिची प्राणज्योत मालवली.

​या मुक्या प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतरही तिची अवहेलना थांबलेली नाही. मृत गाईचा देह घटनास्थळीच तसाच पडून राहिल्याने भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हे विदारक दृश्य पाहून गहिवरून आले असून, या निर्दयी कृत्याबाबत सर्वत्र तीव्र चीड व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुक्या जीवाला आपल्या वेदना शब्दांत मांडता येत नाहीत, म्हणून त्याच्या यातना कमी होत नाहीत. परंतु, एका निराधाराला अशा प्रकारे उघड्यावर मरण्यासाठी सोडून देण्याच्या या कृत्याने मानवी संवेदना आणि माणुसकीवरच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !