महिलांचे शिक्षण आणि सुरक्षितता हेच प्रत्येक भावाचे कर्तव्य - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेरमध्ये सौ. दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन उत्साहात
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून, भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली ती एक बंधुत्वाची देणगी आहे. या पवित्र सणाच्या निमित्ताने महिलांचे शिक्षण आणि त्यांची सुरक्षितता जपणे हे प्रत्येक भावाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने संगमनेर येथे सौ. दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन साजरे केले. या प्रसन्न आणि कौटुंबिक सोहळ्याला डॉ. सुधीर तांबे, शरद थोरात यांच्यासह पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “भारतीय संस्कृती ही मोठ्या विविधतेने नटलेली आहे. आपण अनेक परंपरा आणि सण मोठ्या आनंदाने साजरे करतो. यामध्ये रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतुट आणि निस्वार्थी प्रेमाचा आदर्शवत सण आहे. समाजाला आणि संपूर्ण जगाला बंधुत्वाचा आणि प्रेमाचा संदेश देणारा हा सण भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे.” असे नमूद केले.
सणाचे महत्त्व विषद करतानाच त्यांनी समाजातील वास्तवाकडेही लक्ष वेधले. “केवळ राखी बांधून भावाचे कर्तव्य संपत नाही, तर महिलांचे शिक्षण आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्रत्येक भावाचे खरे कर्तव्य आहे. यासाठी समाजात प्रत्येकाने पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. आपल्या आदर्श परंपरा जपतानाच देशात आणि समाजात बंधुभाव कसा वाढीस लागेल, यासाठी सर्वांनी मिळून काम करावे," असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.