‘बीजमाता’ राहीबाई पोपेरेनी सीमेवरील जवानांसाठी साकारल्या ‘बीज राख्या’

संगमनेर Live
0
‘बीजमाता’ राहीबाई पोपेरेनी सीमेवरील जवानांसाठी साकारल्या ‘बीज राख्या’

​◻️ बहीण-भावाच्या नात्याला दिला निसर्गसंवर्धनाचा स्पर्श!


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊ राया रे..." या मराठी गीतातील ओळींना साजेसे आणि बहीण-भावाच्या नात्यातील पवित्र प्रेम अधोरेखित करणारे एक अनोखे आणि प्रेरणादायी उदाहरण अकोले तालुक्यात पाहायला मिळत आहे. 

‘बीजमाता' या नावाने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाच्या रक्षाबंधनासाठी चक्क ‘बीज राख्यांची' निर्मिती केली आहे. आपले मानलेले भाऊ आणि राज्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या शूर जवानांसाठी त्यांनी स्वतःच्या हाताने या विशेष राख्या बनवल्या आहेत.

निसर्ग आणि गावरान बियाणांच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचणाऱ्या राहीबाईंनी राखी बनवण्यासाठीही आपल्या याच वैशिष्ट्याचा वापर केला आहे. या राख्यांमध्ये भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, घोसाळी आणि डांगर यांसारख्या विविध प्रकारच्या देशी आणि गावरान बियांचा वापर केला आहे. अत्यंत सुबक आणि कलात्मक पध्दतीने बनवलेल्या या राख्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मोठा संदेश देतात. विशेष म्हणजे, या अनोख्या उपक्रमात राहीबाईंना त्यांच्या नातवंड सायली आणि धनश्री यांचीही मोलाची मदत लाभली आहे.

चंद्रकांतदादा पाटील आणि राहीबाई यांच्यातील बहीण-भावाचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी राहीबाईंनी विशेष आपुलकीने या राख्या तयार केल्या आहेत. यासोबतच ‘एक धागा राष्ट्रबांधणीचा’ हा उदात्त विचार जपत त्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या या शूर जवानांसाठी त्यांनी या बीज राख्या थेट सीमेवर पाठवून दिल्या आहेत.

बीज बॅकेच्या माध्यमातून राहीबाईंनी आजवर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना गावरान बियाण्यांचे संवर्धन व पुरवठा केला आहे. या कार्यातून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आपले भाऊ मानले असून, शेतकरीही त्यांना आदराने आपली बहीण मानतात. याच शेतकरी बांधवांच्या प्रेमापोटी आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे.

दरम्यान, ​कुठलेही काम निष्ठेने केल्यास ते सर्वोच्च शिखरावर पोहोचते, हे राहीबाईंनी आपल्या कार्यातून नेहमीच सिध्द केले आहे. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त त्यांनी देशवासीयांना बीज राखीच्या रूपाने दिलेली ही अनोखी भेट केवळ बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक नसून, निसर्ग संवर्धनाचाही एक मोठा संदेश देणारी ठरली आहे. अशी माहिती पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !