महिलांच्या सुरक्षेशी तडजोड नाही; गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारच!

संगमनेर Live
0
महिलांच्या सुरक्षेशी तडजोड नाही; गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारच!

◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांना महिलांनी बांधली राखी


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींचा कायद्याच्या चौकटीत कठोरपणे बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. राहाता येथे आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.

​राहाता नगर परिषदेच्या वतीने नुकताच रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित नगरसेविका, नगर परिषदेतील महिला अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि शहरातील शेकडो भगिनींनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “नगरसेविकेपासून ते रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात ‘आपण हक्काने दादांकडे जाऊ शकतो’ हा विश्‍वास निर्माण होणे, हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे.”

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडताना ते म्हणाले की, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर होत असलेल्या कारवाईबाबत काहींकडून टीका होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा महिलांच्या आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीतच योग्य ते निर्णय घेतले जातील.”

दरम्यान, ​रक्षाबंधनाच्या या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित महिलांशी मनमोकळा संवाद साधला. महिलांच्या सन्मानासाठी आणि कोणत्याही अडचणीच्या काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास या निमित्ताने त्यांनी दिल्याने, नगर परिषदेतील हा सोहळा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा साक्षीदार ठरला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !