अमृतवाहिनी विद्यापीठाला मान्यता; उत्तर महाराष्ट्रातील शिक्षणाला नवी दिशा

संगमनेर Live
0
अमृतवाहिनी विद्यापीठाला मान्यता; उत्तर महाराष्ट्रातील शिक्षणाला नवी दिशा

◻️ कॉस्मेटोलॉजीसह आधुनिक व जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध होणार


​संगमनेर (अनिल शेळके) | ​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेर येथे‘अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थे’तर्फे स्थापन करण्यात आलेले ‘अमृतवाहिनी विद्यापीठ' येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे. राज्य शासनाची मान्यता आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर विद्यापीठाचे कामकाज सुरु झाले असून, ‘कॉस्मेटोलॉजी’ अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आधीच सुरु करण्यात आली आहे.

​येत्या काळात अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) यांसारख्या विविध पदवी, पदविका, प्रमाणपत्र व उच्च धोरणात्मक अभ्यासक्रमांचा विस्तार टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि परदेशातील नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार (एमओयू) करून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कौशल्याधारित शिक्षण, नवोपक्रम आणि उद्योग-संस्था सहकार्याला चालना देऊन उत्तर महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचा मुख्य उद्देश यामागे आहे.

​१९७८ मध्ये सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या संस्थेची पायाभरणी केली होती. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दशकांत संस्थेने अभूतपूर्व विस्तार केला आहे. सध्या या परिवारात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, आयटीआय, एमबीए, फार्मसी, कृषी, फूड टेक्नॉलॉजी, मॉडेल स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल अशा सुमारे १२ शैक्षणिक संस्था यशस्वीरीत्या कार्यरत असून याच समृध्द परंपरेचे रुपांतर आता विद्यापीठात झाले आहे.

​"अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे आमची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. काळाशी सुसंगत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी संगमनेरमध्येच उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख बनवण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल.” असे अमृतवाहिनी संस्थेच्या विश्‍वस्त सौ. शरयू देशमुख यांनी संगमनेर लाईव्ह शी बोलताना सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !