दुर्गापूर येथील दीपक मुळेकर यांच्या अवयवदानाने चार जणांना ‘नवजीवन’

संगमनेर Live
0
दुर्गापूर येथील दीपक मुळेकर यांच्या अवयवदानाने चार जणांना ‘नवजीवन’

◻️ असीम दुःखातही पत्नी अन् भावाचा प्रेरणादायी निर्णय; ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे अवयव रवाना


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​अवघ्या २८ व्या वर्षी अपघाती मृत्यूने कुटुंबाचा मुख्य आधार हिरावून नेल्याने मुळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या असह्य दुःखाच्या प्रसंगीही दीपक भानुदास मुळेकर यांच्या पत्नी आणि भावाने अत्यंत धैर्याने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या एका निर्णयामुळे चार गरजू रुग्णांना नवजीवनाची नवी आशा मिळाली असून, मुळेकर कुटुंबीयांचा हा त्याग संपूर्ण समाजासाठी मानवतेचा एक नवा आदर्श ठरला आहे.

​रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दीपक मुळेकर हे ९ ऑगस्ट रोजी एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना दुर्दैवाने खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय निकषांनुसार त्यांना ‘मेंदूमृत’ (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले.

​दीपक यांच्या मेंदूमृत्यूनंतर रुग्णालयातील मेंदूमृत समिती व अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी मुळेकर कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. जिवलग व्यक्तीला गमावल्याचे अथांग दुःख उराशी असतानाही, दीपक यांच्या पत्नी व भावाने सामाजिक भान जपत अवयवदानास सहमती दर्शवली. त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही फुफ्फुसे पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात, यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर दोन्ही मूत्रपिंडे नाशिक येथील किंग्ज मानवता हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी तातडीने रवाना करण्यात आली.

​दान केलेले हे अवयव वेळेत संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचावेत यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत तत्परता दाखवत लोणी ते पुणे असा ‘ग्रीन कॉरिडॉर' उपलब्ध करून दिला. यामुळे वाहतुकीचा अडथळा न येता हे अवयव वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. या मोलाच्या सहकार्याबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रशासनाने पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले.

दरम्यान, ​अवयवदान जनजागृती सप्ताहात मुळेकर परिवाराने दिलेल्या या मानवतेच्या शिकवणीबद्दल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, प्रवरेचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी मुळेकर कुटुंबीयांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत करून दीपक यांना श्रध्दांजली अर्पण केली.

दुर्गापूर (ता. राहाता) गावचे सरपंच नानासाहेब पुलाटे हे मुळेकर कुटुंबाच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले की, दीपक यांच्या परिवाराने घेतलेला अवयवदानाचा निर्णय हा केवळ एक निर्णय नसून मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे. त्यांच्या या धाडसाला समाजाने सलाम केला पाहिजे. दीपक यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगी आर्थिक आधार मिळावा, यासाठी दुर्गापूर ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन देखील केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !