डॉ. सुजय विखे पाटलांच्या नेतृत्वात राहात्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान
◻️ जनसेवेसाठी कोणत्याही पदाची गरज नाही; डॉ. विखे पाटलांचा विरोधाकाना टोला
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राहाता नगरपरिषद, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या भव्य रॅलीला राहाता शहरात नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला. डॉ. विखे पाटील यांनी स्वतः हातात राष्ट्रध्वज घेत शालेय विद्यार्थ्यांसमवेत संपूर्ण रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
राहाता शहरातील मुख्य मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व जाती-धर्मांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय'च्या घोषणांनी संपूर्ण राहाता शहर देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाले.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, नव्या पिढीमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि कर्तव्याची जाणीव निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. केवळ घराघरावर झेंडा फडकवणे पुरेसे नसून, राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखणे, सायंकाळी तो सन्मानपूर्वक उतरवणे आणि तिरंग्याच्या सर्व नियमांचे व प्रोटोकॉलचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
रॅलीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांकडून होणाऱ्या राजकीय टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. काम करण्यासाठी मला कोणत्याही पदाची गरज नसून जनतेशी असलेले माझे नाते हे पदापेक्षा विश्वासावर आधारित आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांची पूर्तता करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मांडले. तसेच स्वातंत्र्यदिन हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा सण नसून प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन साजरा करण्याचा राष्ट्रीय उत्सव आहे. असे देखील नमूद केले.
याच वेळी महिला व मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना, अन्याय झाल्यास आपली सर्व ताकद पणाला लावून शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची भूमिका त्यांनी घेतली. याशिवाय पक्षशिस्तीचा संदर्भ देत पक्षाची जाहिरात करणाऱ्या व बोर्ड लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा आणि वरिष्ठतेची जाणीव ठेवूनच भाष्य करावे, असा थेट इशाराही त्यांनी नाव घेता स्व पक्षातील विरोधकांना दिला.
दरम्यान, राहात्यातील या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकोप्याचा प्रभावी संदेश देण्यात आला, तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट केली.