श्रीरामपूर येथे १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप
◻️ महा एनजीओ फेडरेशन व श्री इम्पेक्सचा उपक्रम; पर्यावरण संवर्धनासाठी केले वृक्षारोपण
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, या उदात्त उद्देशाने गोंधवणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री इम्पेक्स, महा एनजीओ फेडरेशन पुणे सोशल फाउंडेशन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुन्हा नियुक्ती झाल्याच्या औचित्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीचा मंत्र दिला. ते म्हणाले, “व्यक्ती केवळ पुस्तकी शिक्षणाने मोठी होत नाही, तर तिच्या विचारांच्या प्रगल्भतेने मोठी होते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जोपासत आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करावी.” याप्रसंगी त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘चला गाठू या लक्ष’ या प्रेरणादायी काव्यसंग्रहाच्या १०० प्रती विद्यार्थ्यांना भेट देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आचार्य शुभम महाराज कांडेकर यांनी विद्यालयातील प्रेरणादायी शैक्षणिक वातावरणाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील संधींचे सोने करून यश संपादन करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय शिक्षक गौरव प्राप्त बबानराव तागड यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या मदतीचा योग्य वापर करून प्रगतीचा आलेख उंचावण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत गरजू कुटुंबांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी, प्रास्ताविकात महा एनजीओ फेडरेशनचे प्रसन्न धुमाळ व सूरज सूर्यवंशी यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करत, ग्रामीण भागातील घटकांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी समाजानेही अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असा विचार मांडला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय नान्नर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश कुदळे, अशोक गाडेकर, डॉ. सतीश भट्टड, रामपाल पांडे यांच्यासह महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंद अण्णा शिंदे, राहुल जगताप व श्रीमती अपूर्वा यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, या कार्यक्रमास बाबासाहेब जाधव, संचित आदिक, ऋषिकेश सुरवाडे, प्रकाश शेंडे, किशोर बरकडे, अशोक आघाडे, बापूसाहेब आहेर, विष्णू औताडे, सोमनाथ नाईक, मोहम्मद समीर शेख, श्रीमती गोलवड, लीला आढाव आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रामपाल पांडे यांनी मानलेल्या आभाराने झाला.