तमाशा सम्राज्ञी पवळा हिवरगावकर यांच्या नावाने ‘राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार’

संगमनेर Live
0
तमाशा सम्राज्ञी पवळा हिवरगावकर यांच्या नावाने ‘राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार’

◻️​आमदार अमोल खताळ यांची घोषणा; १० लाखांचा निधी मंजूर


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील कला आणि कलावंतांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. स्थानिक कलाकारांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेऊन त्यांच्या कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक आहे. याच भावनेतून सुरू केलेली सन्मान परंपरा पुढे नेताना, यंदाचा ‘दुसरा कलावंत पुरस्कार’ महाराष्ट्राच्या ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि तमाशा सम्राज्ञी पवळा हिवरगावकर यांच्या नावाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कलावंताला प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.

​हिवरगाव पावसा येथे ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी पवळा हिवरगावकर कला मंचाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात आमदार खताळ बोलत होते. पद्मश्री रघुवीर खेडकर, रिपाइंचे श्रीकांत भालेराव, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, काशिनाथ पावसे, कैलास कासार, गणेश दवंगे, सोमनाथ भालेराव यांच्यासह अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी, नागरिक व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

​आपल्या भाषणात आमदार खताळ म्हणाले की, “संगमनेरमधील कलावंतांचा गौरव करण्याचा उपक्रम आपण गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. पहिल्या वर्षी ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने सातारा येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत आवळे मास्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.”

​ते पुढे म्हणाले, “यंदाचा हा मानाचा पुरस्कार तमाशा सम्राज्ञी पवळा हिवरगावकर यांच्या नावाने दिला जाणार असून, पुरस्कार वितरण सोहळा हिवरगाव पावसा याच ऐतिहासिक भूमीत थाटामाटात पार पडेल.” 

दरम्यान, या सोहळ्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विशेष निमंत्रित करण्यासाठी त्यांच्या वेळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​हिवरगाव पावसा येथील विकासकामा संदर्भात रिपाइंचे श्रीकांत भालेराव यांनी मांडलेल्या भूमिकेला तत्परतेने प्रतिसाद देत आमदार अमोल खताळ यांनी पवळा हिवरगावकर कला मंचाच्या विकासासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून गावातील इतर विकासकामांसाठीही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !