अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीला प्रवरा बॅकेने पाठबळ द्यावे - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीला प्रवरा बॅकेने पाठबळ द्यावे - मंत्री विखे पाटील

◻️ ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर!


संगमनेर LIVE (लोणी) | औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून अहिल्यानगर जिल्हा ओळखला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात येणारी गुंतवणूक लक्षात घेऊन येणाऱ्या उद्योगांनाही मदत करण्याच्या दृष्टीने प्रवरा बॅकेने तयारी ठेवावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा सहकारी बॅकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, प्रवरा फळे-भाजीपाला सोसायटीचे चेअरमन मकरंद गुणे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, शांतीनाथ आहेर, सहकारी संस्थांचे सहनिबंधक नामदेव ठोंबळ, बॅकेचे मॅनेजर सौरभ बालोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा आता औद्योगिक विकासाचे मुख्य केंद्र बनत असून, जिल्ह्यामध्ये शिर्डीसह हरेगाव, बेलवंडी, अहिल्यानगर आणि राहुरी येथेसुध्दा आता औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्‍ध करून दिली आहे. उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. या उद्योगांशी आपण कसे जोडले जाऊ, याचा विचार प्रवरा सहकारी बॅकेने निश्चित करावा अशी अपेक्षा व्यक्त करून, उद्योजक आणि बॅक यांच्यातील नात्यामुळेच जिल्ह्यात रोजगार निर्मितीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.

बॅकेने मागील आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. ५ हजार रुपयांच्या ठेवींवरून बॅकेचा सुरू झालेला प्रवास आता १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे. ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्‍वासाचे हे प्रतीक असून, सुमारे १८०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा पूर्ण केलेला टप्पा हा नागरी सहकारी बॅकिंग क्षेत्रासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि कर्जदार यांच्या मागणीप्रमाणे कर्जाची गरज पूर्ण करण्याचे काम बॅकेच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

सहकारी बॅकांचा प्रवास हा नागरी बॅकांकडून शेड्युल्ड बॅकेकडे होत आहे. बॅकांना आता मूलभूत बदलांना सामोरे जावे लागत असून, प्राथमिक सोसायट्यांबरोबरच सहकारी बॅकांच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेले धोरण हे निश्चितच पाठबळ देणारे आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीमुळे सहकारी बॅकांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मार्गक्रमण करणे सोपे झाले आहे. डिजिटल बॅकिंग सुविधेमुळे ग्राहकांनाही आता योग्य सुविधा मिळत असून, या माध्यमातून व्यवसाय वृध्दी होऊ शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सहकारी बॅका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होत असलेले आर्थिक घोटाळे ही सध्याच्या काळात चिंताजनक बाब झाली आहे. अशा सर्व परिस्थितीतही प्रवरा सहकारी बॅकेने अतिशय पारदर्शकपणे केलेल्या चांगल्या कारभारामुळेच सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य टक्के एनपीए’ राखण्यात संचालक मंडळाला यश आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

दरम्यान, याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तसेच बॅकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

“प्रवरा सहकारी बॅकेने सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य टक्के एनपीए' राखण्यात मोठे यश मिळविले आहे. ठेवीदार आणि कर्जदार यांच्या भक्कम विश्‍वासामुळेच बॅकेची प्रगती चांगल्या पध्दतीने होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर, यंदाच्या वर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.”
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !