टंचाई सदृष्य परिस्थिती निवारणासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा

संगमनेर Live
0
टंचाई सदृष्य परिस्थिती निवारणासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा

◻️ पालकमंत्री विखे पाटील यांचे प्रशासनाला समन्वयाने काम करण्याचे निर्देश


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने संभाव्य टंचाई सदृष्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि तत्परतेने काम करावे. गावनिहाय पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून नागरिकांना पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. 

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील टंचाई सदृष्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

या बैठकीस आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकारी या आढावा बैठकीस  दूरदृश्यप्रणाली द्वारेउपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील पाणीपुरवठा, टॅकरद्वारे पाणी वितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना, पाण्याचे स्थानिक स्रोत, चारा उपलब्धता, पशुधन आणि आगामी पीक नियोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करून गावनिहाय पाणी वाटपाचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता, लोकसंख्या आणि संभाव्य गरज लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना वेळेत कराव्यात. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये नागरिकांना टॅकर कधी येणार याची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ॲपद्वारे टॅकरचे वेळापत्रक निश्चित करावे. यामुळे पाणी वितरणामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यासोबतच नागरिकांचीही मोठी सोय होणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत. पाणीपट्टी थकीत असल्यास ती भरण्यासाठी तसेच वीज देयक थकीत असल्यास त्याची पूर्तता करून बंद असलेल्या योजना पुन्हा सुरू करता येतील का, याचा स्थानिक पातळीवर आढावा घ्यावा. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून जास्तीत जास्त गावांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द आणि सुरक्षित पाणी मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. गावांच्या जवळील उपलब्ध पाण्याचे स्रोत तपासून त्यांचा पाणीपुरवठ्यासाठी प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा. आवश्यकता भासल्यास विहीर तसेच तलाव अधिग्रहणाची प्रक्रिया राबवून पर्यायी पाणी स्रोत उपलब्ध करून द्यावेत.

पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी फिल्टरची सुविधा उपलब्ध करून ग्रामीण नागरिकांना शुध्द पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

टंचाईच्या परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असल्याने जिल्ह्यातील पशुधनाची गणना करून त्यानुसार उपलब्ध चाऱ्याचा आढावा घ्यावा. कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्त बैठक घेऊन चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. भविष्यातील संभाव्य गरज लक्षात घेऊन आतापासूनच योग्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी हायड्रोपोनिक चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. कमी जागेत आणि नियंत्रित पध्दतीने चारा उपलब्ध करून देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे टंचाईच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्यास मदत होणार आहे.

अल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील शेतीचे नियोजन अधिक शास्त्रीय पध्दतीने करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या पीक पद्धतीचा अभ्यास करून उपलब्ध पाणीसाठा, पर्जन्यमान आणि पिकांची पाण्याची गरज यांचा विचार करून पुढील पीक आराखडा निश्चित करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यानुसार योग्य पीक पध्दतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. टंचाईच्या काळात शेतकरी आणि पशुपालकांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने विभागांमध्ये समन्वय ठेवून सकारात्मक आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना कमीतकमी त्रास होईल, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, पाणीपुरवठा योजनांची पूर्तता, टॅकर वितरणातील सुसूत्रता, शुध्द पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा आणि आगामी पीक नियोजन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून टंचाई निवारणाचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

टंचाईची परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, तसेच कोणतीही समस्या स्थानिक पातळीवर प्रलंबित राहू नये, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !