४० वर्षे वाळूचे राजकारण करणाऱ्यांनी घरकुलांचा मार्ग रोखू नये - आमदार अमोल खताळ
◻️ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत प्रशासकीय कामकाजाचा आढावा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ज्यांनी तब्बल चाळीस वर्षे केवळ वाळूवर राजकारण केले, त्यांना आज गोरगरिबांच्या घरकुलांसाठी वाळू मिळू नये असे वाटत आहे. त्यांनी खुशाल राजकारण करावे; परंतु आम्ही यापूर्वीही घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली आहे आणि पुढील टप्प्यातही ती मुबलक प्रमाणात मिळवून दिली जाईल,” असा टोला आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. तालुक्यात सत्ताबदल झाल्यानंतर विक्रमी संख्येने घरकुलांची कामे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संगमनेर पंचायत समिती सभागृहात सोमवारी (दि. २१) आयोजित सर्वंकष आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरकुल योजनेतील त्रुटींवर बोट ठेवत आमदार खताळ म्हणाले, “पूर्वी लाभार्थी निवडीत मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षपात झाल्याच्या तक्रारी येत आहेत. ज्यांची आधीच दोन मजली पक्की घरे आहेत, त्यांना लाभ दिला गेला; तर ज्यांना खरोखर छताची नितांत गरज आहे, असे गरजू आजही वंचित राहिले आहेत. यापुढे असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता केवळ पात्र लाभार्थ्यांचेच प्रस्ताव वेळेत सादर करावेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. हे सर्वसामान्यांचे सरकार असून कागदावर चालणारा संगमनेरचा कारभार आता प्रत्यक्ष कृतीतून पारदर्शक करावा लागेल.”
विरोधकांकडून तालुक्यात विनाकारण वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार खताळ म्हणाले, “हे जनतेच्या हक्काचे आणि हिताचे सरकार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका कायमस्वरूपी टॅकरमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. महायुती शासनाच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याला विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनवायचे आहे. काम करताना शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांना कोणी नाहक त्रास देत असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा; लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, या बैठकीत शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, कृषी, रोजगार हमी योजना (रोहयो) तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांवर विभागनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या कामांचा प्रगती अहवाल सादर केला.
संगमनेर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा.
पावसाअभावी यंदा संगमनेर तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संगमनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे. “तालुक्यातील पावसाची तूट, बाधित पिके आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा वस्तु-निष्ठ अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून बळीराजाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” अशी माहिती देखील आमदार खताळ यांनी दिली.