“सरकार जागे झाले नाही तर जागा सोडावी लागेल!” - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
“सरकार जागे झाले नाही तर जागा सोडावी लागेल” - बाळासाहेब थोरात 

◽दुष्काळ, पाणी व विजेच्या प्रश्नावर संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यात निर्माण झालेली भीषण दुष्काळ सदृश परिस्थिती, जळालेली पिके, विजेचा खेळखंडोबा आणि हक्काचे पळवले जाणारे पाणी या गंभीर प्रश्नांवर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक आणि महिलांनी रस्त्यावर उतरून सरकार व प्रशासनाविरोधात प्रचंड ‘महाआक्रोश मोर्चा’ काढला. “राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना थेट आर्थिक मदत द्या, अन्यथा सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल,” असा इशारा काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

​यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात आलेल्या या विराट मोर्चामध्ये हजारो शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि हातामध्ये जळालेली पिके घेऊन सहभागी झाले होते. मोर्चामध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, युवक नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काॅग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​बस स्थानकासमोरील सभेमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राज्यात पावसाअभावी शेती उद्ध्वस्त झाली असून १९७२ च्या दुष्काळापेक्षाही वाईट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी संकटात असून आत्महत्या करत आहेत; मात्र शासन अद्यापही ढिम्म आहे. केवळ घोषणा आणि खोट्या बातम्या देऊन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम सुरू आहे. आता पंचनाम्यांचे सोपस्कार न करता दुष्काळ जाहीर करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुराला थेट मजुरी व आर्थिक मदत दिली पाहिजे,” अशी मागणी केली.

​पाण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले, “निळवंडे धरण व कालव्यांसाठी रक्ताचे पाणी करून निधी आणला आणि प्रकल्प पूर्ण केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हक्काच्या ३० टक्के पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढलो. आवर्तन काळात ११ तास हक्काची वीज मंजूर करून घेतली. मात्र आज दोन्ही कालव्यांचे पाणी पुढे पळवले जात असून शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उचलू दिले जात नाही. पाणी उचलल्यास ग्रामपंचायतींना लाखोंची वीज बिले दिली जात आहेत. वीज गेली की पाणीही जाते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडत आहे.” असे नमूद केले.

​माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी वीज प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले. “विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. बाजारपेठा ओस पडल्या असून तालुक्याकडे सत्ताधारी आकसाने पाहत आहेत. जगभर प्रकाश पाडल्याचा डांगोरा पिटणारे सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीज का देऊ शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

​तालुक्यातील विकासाचा लेखाजोगा मांडताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “१९८५ पूर्वी तालुक्यात केवळ ३ सबस्टेशन्स होती, आज २८ सबस्टेशन्सचे जाळे उभे करून संगमनेर समृध्द केले आहे. परंतु आजचे काही लोक केवळ फ्लेक्सपुरते मर्यादित राहिले आहेत. कोणतीही मेहनत न घेता श्रेय लाटण्याचा खोटा प्रयत्न सुरू आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी आधी तालुक्याचा इतिहास आणि विकासकामांचा अभ्यास करावा.” अशी बोचरी टीका केली.

​“गावोगावी हजारो फ्लेक्स लावले जात आहेत, पण पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यावर एका शब्दानेही कोणी बोलत नाही. फ्लेक्स लावून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही; तेच पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरा. संगमनेरच्या जनतेला भुलथापा नव्हे, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. अशा निष्क्रिय वृत्तीची तालुक्याला गरज नाही.”​ अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनीही नाव न घेता आमदार अमोल खताळ यांच्यावर केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !