पारनेर शहर पाणीप्रश्नी विजय औटी यांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
◻️ पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठपुराव्याला मोठे यश
संगमनेर LIVE (मुंबई) | पारनेर शहराच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भीषण पाणीप्रश्नाला अखेर कायमस्वरूपी पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरासाठी प्रस्तावित असलेल्या दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत सुरू केली जाईल, तसेच त्यानंतर साधारण एका वर्षात हे काम मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पारनेरच्या पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ही सकारात्मक भूमिका जाहीर केली.
या भेटीदरम्यान विजय औटी यांनी पारनेर शहराच्या सद्यस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची निकड आणि सध्याच्या तोकड्या व्यवस्थेमुळे नागरिकांना सोसावे लागणारे हाल याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली.
“पारनेर शहराचा पाणीप्रश्न हा केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता शहरासाठी शाश्वत आणि दीर्घकालीन योजना मंजूर करून ती कालबध्द पद्धतीने पूर्ण करावी," अशी ठाम मागणी औटी यांनी यावेळी लावून धरली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेरकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला. “राज्य शासन पारनेरच्या पाणीप्रश्नाबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे. येत्या सहा महिन्यांत या योजनेची प्रशासकीय व निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास गती देऊन एका वर्षाच्या आत योजना पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
“पारनेरकरांचा पाणीप्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिकांना दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी शाश्वत व्यवस्था उभी राहणे आवश्यक होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या योजनेला मोठी गती मिळाली आहे. निविदा प्रक्रियेपासून प्रत्यक्ष योजनेचे पाणी पारनेरकरांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील.” अशी माहिती विजय औटी यांनी दिली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणी योजनेला आता कालबध्द स्वरूप मिळाल्याने नगरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाठपुराव्यामुळे पारनेर शहराच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.