उद्या संगमनेरमध्ये १०२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण!
◻️ जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ राहणार उपस्थित
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती देण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उद्या बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न होत आहे. राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या विकासकामांमध्ये प्रामुख्याने रस्ते सुधारणा, शेती सिंचन प्रकल्प आणि नागरी सुविधांचा समावेश असून, या प्रकल्पांमुळे तालुक्याच्या ग्रामीण आणि नागरी भागातील पायाभूत सुविधांचे जाळे अधिक सक्षम होणार आहे.
या विकासकामांमध्ये सर्वाधिक भर दळणवळण सुलभ करण्यावर देण्यात आला असून, समनापूर येथील गणपती मंदिर परिसरातून सुमारे ९७ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या प्रमुख रस्त्यांच्या सुधारणा कामांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये संगमनेर ते वडगाव पान फाटा आणि निळवंडे ते कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग (जांभूळवाडी फाटा) या अत्यंत महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या दर्जेदार रस्त्यांमुळे स्थानिक वाहतूक गतिमान होऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्याचप्रमाणे शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्यासाठी चिंचोली गुरव येथे सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन होणार असून, या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागरी सोयी-सुविधा आणि धार्मिक स्थळांच्या विकासाच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्वास गेली आहेत. संगमनेर नगरपरिषद हद्दीतील साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील पुलाचे नामकरण ‘स्व. खासदार बाळासाहेब विखे साईसेतू’ असे करण्यात आले असून, या नामफलकाचे औपचारिक अनावरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी गंगामाई घाटावर सुमारे ४० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सुसज्ज ‘हिंदू दशक्रिया विधी घाटा’चे तसेच श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिर परिसरात ३० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्रशस्त सभामंडपाचे लोकार्पण यावेळी संपन्न होणार आहे.
दरम्यान, तालुक्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास संगमनेर परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.