​महायुती सरकारने दिलेल्या आश्‍वासनाच्या स्वप्नपूर्तीचे समाधान - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
महायुती सरकारने दिलेल्या आश्‍वासनाच्या स्वप्नपूर्तीचे समाधान - मंत्री विखे पाटील

◻️ हरेगावच्या आकारी पडित शेतकऱ्यांचा प्रदीर्घ लढा यशस्वी; जमिनी मूळ मालकांच्या नावावर


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील ‘आकारी पडित’ जमिनी मूळ शेतकरी मालकांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ संघर्षाला अखेर पूर्ण यश मिळाले असून, महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासन पूर्तीचे समाधान असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे आकारी पडित शेतकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी नेते ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नामदार विखे पाटील यांची भेट घेऊन जाहीर सत्कार केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, गिरिधर आसने, दीपक पठारे, शरद नवले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​शेती महामंडळाच्या ताब्यातील हरेगाव मळ्यातील आकारी पडित जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या नावावर व्हाव्यात, या मागणीसाठी ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले होते. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थेट भेट देऊन, शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर होईपर्यंत शासनस्तरावर व कायदेशीर लढ्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मंत्रिमंडळात सातत्यपूर्ण पाठपुरावा करून विखे पाटील यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणला.

​यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या जमिनी शेतकऱ्यांना न देण्याबाबतचा ठराव झाला होता, तसेच जमिनी उद्योगांना देण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शासनस्तरावर तसेच न्यायालयात भक्कम पाठपुरावा करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

​“शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांच्या नावावर व्हाव्यात, यासाठी कॉ. माधवराव गायकवाड आणि आदरणीय खासदार साहेबांच्या (डॉ. बाळासाहेब विखे पाटील) नेतृत्वाखाली अनेक वर्षे ऐतिहासिक संघर्ष झाला. महायुती सरकारच्या काळात अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत कराव्या लागलेल्या प्रयत्नांमध्ये मला योगदान देता आले, याचे मनस्वी समाधान आहे.” अशी भावनिक प्रतिक्रिया नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !