संगमनेरची आर्थिक समृध्दी मोडू पाहणाऱ्यांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात
◻️ अमृतवाहिनी बॅकेची ४४ वी वार्षिक सभा संपन्न; सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था या मोठ्या कष्टाने आणि त्यागाने उभ्या राहिल्या आहेत. याच संस्थांच्या बळावर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था भक्कम झाली असून आज तालुक्यातील बॅका व पतसंस्थांमध्ये तब्बल ९ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ही तालुक्याची समृध्दी डोळ्यात खुपणाऱ्या काही घटकांकडून ती उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. संगमनेरची ही आर्थिक ताकद टिकवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल; तसेच तालुक्यात जाणीवपूर्वक खोटा अपप्रचार करणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे,” असा इशारा काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बॅकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बॅकेचे चेअरमन सुधाकर जोशी होते. याप्रसंगी लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष मानपत्र देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, बॅकेच्या उत्कृष्ट ग्राहकांचाही गौरव करण्यात आला.
सोशल मीडियाच्या गैरवापरावर तीव्र नाराजी व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज माहितीच्या युगात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. मात्र, काही ‘बिनडोक’ सल्लागारांच्या सांगण्यावरून तालुक्यात जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत. अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. संगमनेर तालुक्यात सध्या विकासकामांवर बोलण्याऐवजी उठसूट पत्रकार परिषदा घेणे आणि फ्लेक्सबाजीचे राजकारण करणे सुरू आहे. मात्र, संगमनेरची जनता सुजाण असून ती या भूलथापांना बळी पडणार नाही.”
राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवत थोरात म्हणाले, “आपली अर्थव्यवस्था शेतीवर आधारलेली आहे. शेती संकटात आली की शेतकरी टोकाचे पाऊल उचलतो. आज दुष्काळसदृश परिस्थिती असून पिके जळून चालली आहेत. खतांचे दर आणि महागाई गगनाला भिडली आहे. सरकार लाडक्या बहिणींना एका हाताने पैसे देऊन दुसऱ्या हाताने महागाईच्या रूपाने काढून घेत आहे. तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असून पिकांना पाणी हवे असताना हक्काचे पाणी डोळ्यादेखत पुढे निघून जात आहे. जर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले नाही, तर पाण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल. सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी.” असे देखील नमूद केले.
बॅकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी बॅकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, “बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बॅकेने १२०० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. अत्यंत शिस्तबध्द कारभारामुळे बॅकेचा नेट एनपीए सलग ‘शून्य टक्के’ राखण्यात यश आले आहे. बॅकेने आधुनिक डिजिटल बॅकिंग, व्हॉट्सॲप बॅकिंग व नेट बॅकिंग सुविधा सुरू केल्या आहेत.” अशी माहिती दिली.
तसेच यावेळी सभासदांना तातडीने ९ टक्के लाभांश एसएमएसद्वारे वितरित करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर भावूक झाले. ते म्हणाले, “तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल लोककला आहे. कोरोनाच्या भीषण संकटात जेव्हा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती, तेव्हा अमृतवाहिनी बॅक आणि थोरात साहेबांनी आम्हाला मोठा आधार दिला. मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संगमनेरच्या भूमीचा व साहेबांच्या आशीर्वादाचा सन्मान आहे. थोरात साहेब हे तत्त्व आणि सत्त्व जपणारे आमचे लोकराजे आहेत.” त्यांच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.